Saturday, February 20, 2016

स्वर हे दिवाणे जन्मकहाणी

स्वर हे दिवाणे  जन्मकहाणी
 संगीत आणि कवितेची ओळख लहानपणी आई मुळे झाली.  मेडिकल कॉलेज आणि सायन रुग्णालयात  पहिल्या काही कविता लिहिल्या.  लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेजच्या मराठी वाडःमय मंडळाच्या भित्तीपत्रकावर त्या प्रसिध्द झाल्या आणि अनेकांच्या मनाला भिडल्या. डॉक्टर मुकुल आचार्य एक वर्ष ज्युनियर. कल्याणचे लहानपण.  उत्कृष्ट पेटीवादक आणि संगीतवेडा मुलगा.  मेडिकल कॉलेज च्या  वातावरणात आम्ही  दोघांनी मिळून काही गाणी तयार केली. मुंबई मधे  छोट्या मोठ्या स्पर्धांमधे ही गाणी सादर झाली. काही जमली काही अपुरी राहिली. होता होता वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाले. मी पुण्यात आलो . छाती रोग तज्ज्ञ म्हणून थोडाफार नावारूपाला आलो. मुकुल ई.एन.टी.  तज्ज्ञ होउन इंग्लंड ला स्थायिक झाला.  प्रॅक्टीसच्या रगाड्यात संगीत बाजूला पडलं.
तीस वर्षे अशीच गेली.
आणि मग एक  नवं पर्व सुरू झालं. डॉक्टर विजय आठल्ये  सायन रुग्णालयातील आमच्या पिढीचे जगनमित्र! त्यांनी जुन्या मित्रांना एकत्र आणले. मोबाईल, ईमेल,   फेसबुक करता करता शेवटी सर्व मंडळी आली व्हाॅटसअॅप वर. पुन्हा  गप्पा सुरु झाल्या. तीस वर्षे काळ जणू मागे गेला. आणि मग विजय ने एक दिवस सुरू केला  'मिले सुर मेरा तुम्हारा ' नावाचा ग्रूप!  पन्नास संगीत वेडे डाॅक्टर्स एकत्र आले. हा ग्रुप दिवसरात्र फक्त संगीत चघळतो.
या जोरदार संगीत धक्क्याने  मी पुन्हा एकदा कविता लिहिल्या. मिसुमितु वर मिळणारी दाद हा  एक महत्वाचा घटक त्यासाठी कारणीभूत ठरला.
मुकुल आचार्य हा तर सांगितीक ज्ञानाचं एक अखंड चालू कारंजे आहे. ऊर्दू पासून संस्कृत पर्यंत अनेक भाषांचा व्यासंग, रागदारीपासून अवघड काॅर्डस पर्यंत  संगीताचे चौफेर ज्ञान,या सगळ्या गोष्टींमुळे मुकुल एक परिपूर्ण संगीत दिग्दर्शक आहे.    
गेल्या दोन वर्षांत आम्ही वीसेक गीते निर्माण केली. कधी आधी कविता आणि मग चाल.  तर कधी आधी चाल मग त्यात मी शब्द भरले. गंमतीचीगोष्ट म्हणजे सर्व काही व्हाॅटसअॅप वर. शब्द, चाल , गाणी आणि मधले  म्युझिक तुकडे सुद्धा! पाच हजार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कवि आणि संगीत दिग्दर्शकानी एकत्र येऊन पूर्ण पणे व्हाॅटसअॅप वर निर्माण केलेला असा हा एक आगळावेगळा अल्बम आहे 'स्वर हे दिवाणे' !
 प्रसिद्ध गायक मंडळी कसे सहकार्य करतील अशी थोडी शंका मनात होती. पण रेकॉर्डींग चा प्रत्यक्ष अनुभव एक आनंद सोहळा होता.  रंजनाताई जोगळेकर एक निगर्वी आणि मेहनती कलाकार आहेत.  त्यांच्या दोन्ही गीतांमधे रंजनाताईनी जीव ओतला आहे.
स्वप्नील बांदोडकर ची रोमॅन्टिक गाणी तो दिलखुलास गायला आहे. 'गीतात माझ्या' हे शीर्षकगीत आणि 'ये ना प्रेमात' हे स्वप्नील अस्मिता चे  युगुल गीत सहजता आणि कसब यांचा सुरेख मिलाफ आहे. बेला शेंडे  'दृष्टीत नाही किनारा'  सहजसुंदर गातात.
अस्मिता दिक्षित  आमची लंडनची डॉक्टर मित्र! 
उत्तम आवाज आणि प्रभावी भावव्यक्ती यामुळे तिने दिग्गज कलाकारांसमोर  सहजपणे गायले आहे.
संजीव अभ्यंकर म्हणजे मुलायम आवाज आणि असाधारण गायकी. त्यांची 'हे कृपाघन' ही नवयुगाची प्रार्थना हृदयाला भिडते
सरतेशेवटी सर्वात महत्त्वाचे. कृपाघन म्युझिक हा अल्बम रसिकांसमोर सादर करीत आहे.  आठ गाण्यांची सीडी शंभर रुपये किमतीला उपलब्ध आहे. सीडी विक्रीतून मिळणाऱा सर्व फायदा आम्ही डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या 'हेमलकसा' प्रकल्पास  अर्पण करीत आहोत. सीडी साठी संपर्क साधावा  - 9075720299. Email - nitimadh@hotmail.com





No comments:

Post a Comment